मुंबई (वृत्तसंस्था )- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला होता . आता निवडणूक आयोगानेही त्यांना धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. पहिला धक्का शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला,तर आता दुसरा धक्का म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीपुरतेच वापरता येणार असा धक्का दायक आदेश निवडणूक आयोगाने दिला . त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न उद्धव ठाकरे समोर निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता समता पक्षानेही निवडणूक आयोगाकडे धाव घेत मशाल चिन्ह आपल्याला द्यावे, अशी मागणी केली असल्याने उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. .
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना म्हणत धनुष्यबाणावर दावा केला. तेव्हा निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह दिले.
आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन उद्धव ठाकरे याना अजून एक धक्का देत , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत वापरता येणार असा आदेश दिला आहे . त्यामुळे ठाकरे गटाची पुन्हा एकदा कोंडी झाली आहे.
दरम्यान समता पक्षानेही मशाल हे चिन्ह आपल्याला द्यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलास झा यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाने काल निकाल दिला. त्यामुळे आता आमचे मशाल चिन्ह आम्हाला द्यावे, असे म्हटले आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मशाल हे चिन्ह आणि सध्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव कायम ठेवावे, अशी मागणी ते करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे यांनी आज पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यात यावर निर्णय होऊ शकतो.
चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंतच पक्षाचे नाव अन् मशाल चिन्ह वापरता येणार- उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ संपता संपेना
