Live
जालना दर्पण

जालना जिल्हयात मानव विकासच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात– मानव विकासचे आयुक्त नितीन पाटील

जालना, (प्रतिनिधी)—तळागळातील लोकांच्या उन्नतीसाठी मानव विकासच्या योजना जालना जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, अशी सूचना मानव विकासचे आयुक्त नितीन पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जालना जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या मानव विकासच्या कामांचा आढावा श्री. पाटील यांनी आज घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, मानव विकासचे नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विलास खिल्लारे, माविचे जिल्हा समन्वयक उमेश कहाते शैलेश चौधरी, रेशम अधिकारी ए.पी. मोहिते आदी उपस्थित होते.
नितीन पाटील म्हणाले की, जालना जिल्हयाच्या आठही तालुक्यात मानव विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील महिला, मुली, शेतकरी यांच्यापर्यंत मानव विकासाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने पोहोचवावा. जिल्हयात आठवी ते बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या 13 हजार मुलींना सायकल वाटप करण्यात आली आहे. अद्याप गरीब घरातील ज्या पात्र मुलींना सायकल मिळाली नाही, त्यांना प्राधान्याने सायकल दयावी.
मानव विकासाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात गरीब महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. जालना जिल्हयात उदिष्टाप्रमाणे शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. विशेषत: दुर्गम भागातही शिबीर आयोजित करण्यात आली आहेत. याबाबत चांगले काम जिल्हयात होताना दिसत आहे. मानव विकासाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दारिद्रय रेषेखालील महिलांना प्रसुतीपूर्वी रुपये दोन हजार व प्रसुतीनंतर रुपये दोन हजार असे एकूण चार हजार रुपये दिले जातात. याच लाभ जास्तीतजास्त पात्र महिलांना जिल्हा प्रशासनाने द्यावा.
रोजगार निर्मिती योजना मागील वर्षांपासून जालना जिल्हयात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मागील वर्षी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, असे सांगून श्री. पाटील म्हणाले की, यावर्षी प्रत्येक तालुक्याला दोन कोटी रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. रोजगार निर्मिती योजनेतंर्गत जाफराबाद व भोकरदन तालुक्यात आदिवासी व गरीब लोकं बिबापासून गोडंबी काढण्याचा उदयोग करीत आहेत, त्यासाठी त्यांना 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. माविम मार्फत जालना येथील औद्योगिक परिसरात व्हाईट कोलची 50 लाखांची योजना मंजूर करण्यात आली आहे. औद्योगिक परिसरात मोठया प्रमाणात स्टील उदयोग आहेत त्यांना जळणासाठी कोळशाची आवश्यकता असते. जिल्हयात मोठया प्रमाणात कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्यातून निघणाऱ्या कचऱ्यापासून जळणाकरीता व्हाइट कोलच्या माध्यमातून ब्रिकेटस तयार करता येणार आहे. तेजस्वीनी फायनान्स व मानव विकास या दोघांच्या निधीतून सदर ठिकाणी व्हाईट कोलचा चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट लवकरच तयार होईल.
जालना जिल्हयात रेशीम उद्योगचे कामही चांगले सुरु आहे. त्यासाठी यावर्षीचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. जिल्हयात रेशीम उदयोगाचे हब तयार केले जाईल. त्याचा लाभ जालनाच नव्हे तर आजबाजुच्या जिल्हयातील शेतकऱ्यांनासुध्दा होईल. या उपक्रमाकरीता मानव विकासकडून निधी दिला जाईल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!