Live
जालना दर्पण

विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मार्गी लावावेत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

जालना(वृत्तसंस्था ) – विविध महामंडळे आणि विविध ‍विभागांचे शासकीय योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांनी तातडीने मार्गी लावावेत. या अनुषंगाने या वर्षी दिलेले उदिष्ट बँकांनी तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा स्तरीय बँकर समितीची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पाडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे आदींसह सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी चालू वर्षातील विविध शासकीय विभाग व महामंडळे यांच्यामार्फत लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अनुषंगाने बँकांमार्फत मंजूर करावयाचे प्रस्ताव याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये जिल्हा उदयोग केंद्रामार्फत बेरोजगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना यासह अण्णाभाऊ साठे विकास विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व या योजनांच्या लाभार्थ्यांना बँकेमार्फत देण्यात येणारे आर्थिक सहाय यांचा आढावा घेतला. चालू वर्षात देण्यात आलेले पिककर्ज, मुद्रा योजना, स्टॅण्डअप इंडिया योजना, पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रीया, महाराष्ट्र राज्य ग्रामोन्नती अभियानातंर्गत बँकांनी मंजूर केलेले प्रस्ताव व प्रलंबित प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. विविध विभाग व महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना या सामाजिक योजना असल्याने बँकांनी याबाबतचे लाभार्थ्यांचे प्रस्ताव जबाबदारीने व तातडीने मार्गी लावावेत याबाबत कुठल्याही प्रकारची दिरंगाई करु नये, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी केली.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!