Live
आरोग्य दर्पण

हॅप्पी हायपोक्सिया – कोरोनाचा त्रास वाढवणारी स्थिती

कोव्हिड-19 मुळे आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचा जीव गेला आहे. हे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या आजारासोबत जर हॅप्पी हायपोक्सिया नावाची स्थिती असेल तर त्या रुग्णाच्या त्रासात आणखी भर होते.

शॉर्टनेस ऑफ ब्रेथ:
कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फुसांवर आघात करतो. फुफ्फुसात शिरकाव झाल्यानंतर कोरोना व्हायरस मोठ्या संख्येने पसरतो किंवा गुणाकार करतो. ज्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
वैद्यकीय भाषेत याला ‘शॉर्टनेस ऑफ ब्रेथ’ असं म्हणतात. क्रिटिकल स्टेजमध्ये श्वास घेता येत नाही, शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड खालावते आणि रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटर सपोर्टची गरज भासते.
रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर डॉक्टर तातडीने कोरोनाची तपासणी करण्याची सूचना करतात. श्वास घेण्यास त्रास होणं, कोरोनाचा संसर्ग झाल्याचं हे एक प्रमुख लक्षण आहे.

हॅप्पी हायपॉक्सिया म्हणजे काय?
मुंबई आणि महाराष्ट्रात डॉक्टरांना कोव्हिड-19 चं एक दुर्मिळ लक्षण पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असलं, तरी रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत नाही.
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली असली तरी रुग्ण सामान्य दिसत असतो. श्वास घेण्यास अडथळा होण्याची लक्षणं दिसून येत नाहीत. वैद्यकीय भाषेत डॉक्टर याला ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ ‘Happy Hypoxia’ असं म्हणतात.

हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे एक गंभीर परिस्थिती आहे. चोरपावलाने हळुहळू शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, कळतही नाही आणि परिणाम गंभीर होतात.

कोव्हिडमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. रक्तात ऑक्सिजनची योग्य देवाण-घेवाण होत नाही. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते. पण, याची लक्षणं दिसून येत नसल्याने, कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
हृदयरोग आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या 10 ते 12 टक्के रुग्णांमध्ये हॅप्पी हायपॉक्सिया आढळून येतो. यावर योग्य उपचार झाले नाहीत तर मोठी गुंगागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. हॅप्पी हायपॉक्सियाची अनेक कारणं आहेत. हिमोग्लोबिनची कमी मात्रा, छातीचा आकार, योग्य पद्धतीने ऑक्सिजन बाइंडिंग न होणं यामुळेदेखील हॅप्पी हायपॉक्सिया होवू शकतो.

फुफ्फुसाचे आजार असलेल्या लोकांमध्ये शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. या रुग्णांचं शरीर कमी ऑक्सिजनसाठी ट्यून झालेलं असतं. अशा रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांना लक्षणं लवकर दिसून येत नाहीत. या रुग्णांना शरीरातील ऑक्सिजन कमी झाला तरी ते सामान्यांसारखेच दिसतात. मात्र, शरीरातील ऑक्सिजनची मात्रा खूप क्रिटीकल झालेली असते.

यासाठी कम्युनि़टीमध्ये जावून रुग्ण शोधणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून लोकांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी असेल तर त्यांच्यावर लगेचच एक्स-रे आणि इतर तपासण्याकरून उपचार करता येतील.

हायपोक्सिया’ची लक्षणं:

त्वचेचा रंग बदलणं,
गोंधळाची परिस्थिती
कफ, हृदयाचे ठोसे अचानक वाढणं
जोर-जोरात श्वास घेणं
अचानक खूप घाम येणं

सामान्यांनी काय करावं?
शरीरातील ऑक्सिजनची पातळी आपल्याला घरबसल्याही मोजता येणं शक्य आहे. ‘पल्स ऑक्सिमीटर’च्या मदतीने आपण सहजतेने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो.

त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की दिवसातून 10 वेळा आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. कोव्हिडच्या संसर्गासोबत जगताना याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीव वाचवायचा असेल तर प्रत्येक घरात 1 पल्स ऑक्सिमीटर असणं गरजेचं आहे.
निरोगी माणसाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही 95 ते 99 इतकी असते. या पेक्षा कमी असेल तर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ऑक्सिमीटरचा वापर करावा.

डॉ. स्वप्नील बी. मंत्री
बालरोगतज्ञ


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!