Live
महाराष्ट्र दर्पण

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृती बाबत अफवांना वाव देऊ नका -केंद्रीय मंत्री स्मृति इराणी

मुंबई (वृत्तसंस्था)- कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गानकोकिळा लता मंगेशकरयांना आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहावे लागणार आहे. रुग्णालयाशी संबंधित एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. मात्र, डॉक्टरांनी आणखी किमान एक आठवडा खबरदारी घेत देखरेखीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लता मंगेशकर यांना आणखी एक आठवडा रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.डॉ. प्रतीत समदानी यांच्यासह 5 डॉक्टरांचे पथक लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8-9 जानेवारीच्या मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातील एका सूत्राने एबीपीशी बोलताना सांगितले की, पुढील एक आठवड्यासाठी लता मंगेशकर यांना आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत डॉक्टरांना कोणतीही घाई करायची नाही आणि यावेळी त्यांना बाहेरील वातावरणात देखील ठेवायचे नाही, असे सूत्राने सांगितले. असे केल्याने त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असल्याचे देखील सूत्राने सांगितले.92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात ‘प्रभू कुंज’ येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ. प्रतीत समदानी यांनी एबीपी न्यूजला सांगितले होते की, लता दीदींना कोरोनासोबतच न्यूमोनिया देखील झाला आहे, ज्याला ‘कोविड न्यूमोनिया’ असेही म्हणतात.
दरम्यान दीदी च्या प्रकृती बाबत सोशलमीडिया वर अफवा व चुकीच्या बातम्या पसरविल्या जात होत्या . दीदींची प्रकृती सुधारत असल्याने त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवणं कृपा करून थांबवा अशी विनंती मंगेशकर कुटुंबियांच्या प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी केली.त्यांच्या या विनंती ला दुजोरा देत केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी अफवा पसरवणं बंद करण्या बाबत आवाहन केले आहे .


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!