Live
कृषी दर्पण

महागाईमुळे शेती मशागतीचा खर्च वाढला -खते, बियाणांच्या किमतीतही वाढ

एका सर्व्हेनुसार जालना जिल्ह्यात रासायनिक खतांचा अति वापर केला जातो. तेव्हा शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. त्याऐवजी सेंद्रिय खत वापरावे. शेती करताना ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर खत आणि पाणी हे दोन्हीही कमी लागते. शिवाय ठिबकसाठी विद्राव्य खते वापरता येतात तज्यांचा खर्च खूप कमी असतो. - रोहन कोहिरे ,सह व्यवस्थापक, आत्मा.

मंठा (प्रदीप देशमुख ) :- खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी हंगामपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे. परंतू यावर्षी खते आणि बियाणांचे भाव वाढले असून डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचा खर्च देखील वाढला आहे. शिवाय दिवसाला तीनशे रुपये रोजंदारी द्यावी लागत असल्यामुळे आतापासूनच खरीप हंगामासाठी शेतकरी पैशाची जुळवाजुळव करताना दिसत आहे.

अनेक वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी कोरोना महामारीचे संकट उभे आहे. मागील काही दिवसापासून डिझेलचे भाव वाढत असल्यामुळे ट्रॅक्‍टरने नांगरणी करण्याचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकरी 1200 ते 1400 रुपये देऊन नांगरणी करून घ्यावी लागत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा खर्च 200 ते 400 रुपये वाढला आहे. तसेच रोटावेटरसाठी 600 ते 700 रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय कोळपणी, पाळी घालणे, काडी कचरा वेचणे यासाठी मजुरांना प्रतिदिन तीनशे रुपये रोजंदारी द्यावी लागत आहे. याबरोबरच रासायनिक खताचे भाव 20 ते 25 टक्के इतके वाढले असून बियाणे कंपन्यांनी सुद्धा आपल्या किमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतीसाठी पैसा उभा करायचा कसा ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. डीईपी , 20 :20 :013, 10 : 26 : 26, 15 :15,12 : 32 :16 यासारख्या खताच्या किमती 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे.
भाजीपाला आणि फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील यावर्षी कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लावलेला खर्चदेखील काढणे जिकिरीचे झाले आहे. द्राक्ष बागायतदारांना देखील यावर्षी लॉकडाऊनमुळे फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून दुसरीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर महागाई वाढल्याने हंगामासाठी पैसे जमवावेत कसे या समस्येने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
यावर्षी कृषी विभागाच्या वतीने रासायनिक खतांचा वापर किमान 10 % कमी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच बियाणांचा खर्च वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरावे असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांना घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, शिवाय कोरोना महामारीच्या काळात आरोग्यविषयक खर्च सुद्धा वाढलेला असताना यावर्षी खरीप हंगामासाठी आतापासूनच पैशाची जुळवाजुळव करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत पुन्हा शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभी राहण्याची वेळ येते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.

यावर्षी शेतीचा खर्च वाढला आहे. डिझेल महाग झाल्यामुळे नांगरणी आणि रोटावेटरसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय खते आणि बियाणे यांच्या किमती देखील वाढल्यामुळे खरिपासाठी पैसा उभा करावा कसा ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

  • दिनकर हेलसकर, शेतकरी

लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!