जालना (वृत्तसंस्था) – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दि. 17 सप्टेंबर 2022 ते दि. 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जालना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनेतंर्गत दि. 10 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले सर्व अर्ज या पंधरवड्यात निकाली काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडयाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पंडित वासरे, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान पिक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना आदी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेऊन या योजनेतंर्गत प्रलंबित असणारे अर्ज सेवा पंधरवडयात निकाली काढण्याची सूचना केली. याशिवाय पीएम किसान योजने अंतर्गत कृषी विभागास नेमून दिलेल्या गावांमध्ये ई-केवायसीचे काम कृषी सहाय्यकांमार्फत एका आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.
सेवा पंधरवडयात शेतकऱ्यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत –जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
