Live
विश्व दर्पण

भारतीय योग विद्या जागतिक शांतता प्रकियेत महत्त्वाची भूमिका निभावू शकते-योगाचार्य डाॅ.दीपक दिरंगे

परतूर(प्रतिनिधी)-सध्या जगात सर्वत्र युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. धर्म,जात,पंथ,राष्ट्र यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू आहेत.अशा अभूतपूर्व अशांततेच्या काळात भारतीय योग विद्या जगाला तारून नेऊ शकते,असे प्रतिपादन योगाचार्य डाॅ.दीपक दिरंगे पाटील यांनी केले.ते जागतिक योग दिनानिमित्त नादब्रह्म योग साधना केंद्र परतूर व सेवा साधना गुरूकुल रोहिणा यांच्या वतीने आयोजित योग शिबिरात बोलत होते.
योग शिबिराच्या प्रारंभी श्री महर्षी पतंजलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर सेवा साधना गुरूकुलचे संचालक गंगाराम बहाड, सुरेश बहाड, भाऊसाहेब ठुबे हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डाॅ.दीपक दिरंगे पुढे म्हणाले की , पतंजलींच्या योगशास्त्रास ‘भारतीय मानसशास्त्र’ म्हणून ओळखल्या जाते. शरीर, मन आणि आत्म्याचा संयोग म्हणजे योग होय. योग ही शांततापूर्ण सहजीवन जगण्यासाठी मानवजातीला लाभलेली देणगी आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडले तर राष्ट्राचे स्वास्थ्य बिघडते.अस्थिर राष्ट्र जागतिक शांततेसाठी धोकादायक ठरते.आज जगात सर्वत्र अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून योग विद्याच मार्ग काढू शकते. असेही डाॅ.दीपक दिरंगे म्हणाले.
प्रारंभी गंगाराम बहाड यांनी परिचय करून देताना सांगितले की, डाॅ.दीपक हे आयुर्वेद शास्त्रात एम.डी.झालेले असून योगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन हरिव्दार येथील गायत्री विद्यापीठात ‘ योगशास्त्र आणि आयुर्वेद ‘ या विषयात पीएच.डी.करीत आहेत.
या योग शिबिरात डाॅ.दीपक यांनी योग, प्राणायाम,ध्यान आदी योगिक प्रक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखवून उपस्थियांना यात सहभागी करून घेतले. शेवटी सुरेश बहाड यांनी आभार प्रकटीकरण केले. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक,गावातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!