मुंबई (वृत्तसंस्था)- राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदलहोत असून कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाटअशी एकंदरीत परिस्थिती दिसत आहे .
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस काही अंशी कमी होत आहे . सध्याच्या गडीला हवामानात झालेले बदल पाहता राज्यातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या वर गेलं असून उष्णतेचा दाह आता मोठया प्रमाणावर जाणवताना दिसत आहे. ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली असून आरोग्य विभाग आणि हवामान खात्याकडून नागरिकांना घरा बाहेर निघताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामुळं पुणे जवळच्या भागातील तापमान 40 अंशांवर जाऊ शकतं. चंद्रपुरात तापमानाचा आकडा 43.6 अंशांवर पोहचला आहे . पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, वाशिमचं तापमानही 42 अंशावर पोहोचलं असून परभणीचा पारा 41 अंशांपर्यंत गेला आहे. तापमानाचे हे आकडे पाहता सध्या राज्यात दुपारच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी झालेली दिसत आहे .