औरंगाबाद (वृत्तसंस्था ) –महाराष्ट्र पुन्हा एकदा गारठला आहे. परभणीचे तापमान 8.2 अंश सेल्सिअसवर, नागपूरचे तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर, औरंगाबादचे तापमान 9.6 अंश सेल्सिअसवर तर पुण्याचे तापमान 10.3 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले आहे. येणाऱ्या काळात थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात थंडी गायब झाली होती. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, आता उत्तर भारत आणि राजस्थानामध्ये थंड वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारत आणि राजस्थानमधल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राचे तापमान घसरले आहेत. त्यात परभणी 8.2, नागपूर – 9.4, औरंगाबाद – 9.6, यवतमाळ – 10.0, पुणे – 10.3, अमरावती 10.5, अकोला – 10.6, गोंदिया 10.8, वर्धा 11.2, चंद्रपूरचे तापमान 11.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
देशभरात अनेक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यात उत्तराखंड, तामिळनाडू, केरळचा दक्षिण भाग, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, या भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीने पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेकांनी थंडी संपली म्हणत स्वेटर, टोप्यांना कपाटात जागा दिली होती. मात्र, अचानक थंडी सुरू झाल्याने पुन्हा एकदा स्वेटर, टोप्या, जॅकेट बाहेर निघाले आहेत. विशेषतः तिबेटी मार्केट आणि वूलन बाजारकडे खरेदीसाठी अनेकांनी पावले वळवली आहेत. अजून काही दिवस थंडीचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.