Live
महाराष्ट्र दर्पण

कीर्तनासाठी उशीर – महाराजांना चक्क हेलिकॉप्टर ने आणले

वाघोली (प्रतिनिधी )- प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना पाच तास उशीर होणार असल्याचे समजताच भाविकांनी हेलिकॉप्टर ची सोय करून सुखद धक्का दिला.
पाच तासांचा प्रवास अवघ्या 55 मिनिटात झाल्याने महाराष्ट्रात समाधान महाराजांची हेलिकॉप्टर ‘वारी’ महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत आहे. सांगलीतील कथा झाल्यानंतर 55 मिनिटांमध्ये पुण्यातील वाघोलीकडे हेलिकॉप्टरने महाराजांनी प्रवास केला. महाराजांना काही करून कीर्तनासाठी घेऊन यायचे असा चंगच वाघोलीमधील भक्तांनी बांधला होता. त्यामुळे आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेत केज येथील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांत वाघोलीला हेलिकॉप्टरने आणत भाविकांना सुखद धक्का दिला. सांगलीमधील रामकथा सोडून महाराजांना दोन तासांमध्ये पुण्यातील वाघोलीत कीर्तनासाठी येणे अशक्य होते.
या बद्दल सविस्तर माहिती अशी कि ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचा सांगलीमध्ये रामकथेचा कार्यक्रम सुरु आहे. तथापि, महाराजांना पुण्यातील वाघोलीमध्ये कीर्तन कार्यक्रमाचे सुद्धा निमंत्रण होते. मात्र, सांगलीतून वाघोलीला जाण्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार होता. दुसरीकडे सांगलीमधील रामकथा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संपणार होती . त्यामुळे आयोजकांनी नामी शक्कल लढवत सांगली ते वाघोली समाधान महाराजांसाठी थेट हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यामुळे समाधान महाराज फक्त 55 मिनिटांमध्ये कीर्तनासाठी वाघोलीत पोहोचले. हेलिकॉप्टरमधून नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल होताच महाराजांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
राजकीय नेत्यांकडून सभा तसेच दौऱ्यांसाठी वेळेच्या बचतीसाठी हेलिकॉप्टरचा वापर हा सामान्य असला, तरी कीर्तनासाठी महाराजांकरीता केलेली हेलिकॉप्टरची व्यवस्था चर्चेचा विषय झाला आहे. यानिमित्ताने समाधान महाराजांना मात्र हेलिकॉप्टर वारी झाली. आयोजकांनी केलेल्या सोयीमुळे समाधान महाराज चांगलेच भारावून गेले. त्यांनी आयोजकांचे आभार मानले. वारकरी संप्रदायाप्रती आयोजकांची निष्ठा व प्रेम दिसून येत असल्याचे समाधान महाराज म्हणाले.


लेटेस्ट बातम्या मराठीतून वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून डाउनलोड करा "जीवन दर्पण" मोबाइल अँप

error: Content is protected !!