मुंबई (वृत्तसंस्था )- आज शिवप्रताप दिनाला जो उत्साह दिसून येत आहे तो राज्यात परिवर्तन झाल्या मुळे आहे , आणि शिवरायांच्या पुण्याईनेच या सगळ्या गोष्टी घडल्या, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगडावर शिवप्रतापदिनी केले. प्रतापगडावर 363 वा शिवप्रतापदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले यांनी अनुपस्थित राहून नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात परिवर्तन झालं नसतं, तर आज शिवप्रताप दिनाला हा उत्साह दिला नसता, शिवरायांच्या पुण्याईमूळेच हे सर्व घडले आहे . ते पुढे म्हणाले, प्रतापगढाची माती इतिहासाची साक्ष देते. एक आदर्श राजा म्हणून संपूर्ण विश्व शिवरायांकडे पाहते. आपण 363 वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे ही मागणी होती. नियमाने व कायद्याने काम करण्याचे धाडस दाखवत नव्हते, पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय शासनाने घेतला . या बद्दल पोलिस व प्रशासनाचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले, माझ्या सरकार ची एकही कॅबिनेट बैठक अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शिवप्रताप दिनाला उपस्थित राहणे यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी नाही. अनेक जलदुर्ग महाराजांनी उभे केले. छत्रपती शिवरायांना आरमाराचे जनक मानले पाहिजे. मोदींनी नेव्हीच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर केला. आपण त्यांचे मावळे आहोत हे सांगायला अभिमान वाटतो. आपले गडकोट इतिहासाची साक्ष देणारे आहेत. दुर्ग प्राधिकरण स्थापन गडांचे संवर्धन करु, कोठेही पैसे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, तसेच अतिक्रमण हटवले जातील. हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या आशीवार्दाने मुख्यमंत्री झाला असेही ते म्हणाले.